महाआघाडीचा मसुदा तयार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2019

महाआघाडीचा मसुदा तयार


मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात येणार असून त्यांनी मसुद्याला मंजुरी देताच राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. या पहिल्याच बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली असून किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा तयार करताना कोणतीही अडचण आली नसल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यांना दिली. आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मसुदा पाठवला जाईल. त्यांनी काही बदल सुचवल्यास बदल केले जातील किंवा त्यांनी या मसुद्याला तात्काळ मंजुरी दिल्यास राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन केली जाईल. राज्यात लवकरात लवकर आघाडीचं सरकार स्थापन करण्याची जनतेची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांची या मसुद्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत मसुद्यातील तपशील उघड करता येणार नाही. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. एक-दोन इतर मुद्दे होते. त्यावरही चर्चा होणार असून त्यावरही मार्ग काढला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. दरम्यान, वडेट्टीवार यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा झाली? हा मुद्दा मसुद्यात असेल की नाही? यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आज झालेल्या या संयुक्त बैठकीला शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते या बैठकीला उपस्थित होते.

Post Bottom Ad