मुंबई - ईसीजीमध्ये शॉकसर्किट होऊन लागलेल्या आगीत चार महिन्याच्या 'प्रिन्स'चा हात निकामी झाला. स्थायी समितीत या प्रकरणाचे पडसाद उमटताच केईएम रुग्णालय प्रशासनाने 'प्रिन्स' च्या नातेवाईकांना भेटण्यास परवानगीची सक्ती केली आहे. सुरक्षा रक्षकांना तसे निर्देश असल्याने नातेवाईकांना देखील मज्जाव केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
हृदयावरील उपचाराकरिता प्रिंस राजभर या चार महिन्यांच्या चिमुकल्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गेल्या आठवड्यात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन गादीलाही आग लागली. यामध्ये बाळाचा हात गंभीररीत्या भाजल्याने शस्त्रक्रिया करून हात काढून टाकावा लागला. या दुर्घटनेत बाळाच्या कानालाही मोठ्या प्रमाणात इजा झाली. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीत सर्वपक्षीयांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध केला. तसेच प्रमूख तीन रुग्णालयांच्या संचालकांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवालानंतर कारवाईची ग्वाही अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी दिली. मात्र, या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीत उमटताच केईएम रुग्णालय प्रशासनाने 'प्रिन्स'च्या नातेवाईकांना भेटण्यास परवानगीची अट घातली आहे. त्यासाठी आयसीयू कक्षाबाहेर सुरक्षारक्षक तैनात केले असून प्रिन्सच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना परवानगीची विचारणा केली जात आहे. प्रिन्सच्या घटनेने आधीच खचलो आहोत. त्याच परवानगीची सक्तीमुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे असे सांगताना प्रिन्सचे नातेवाईकांना अश्रू अनावर होत आहेत. तर प्रशासनाचे आदेश पाळणे आमचे कर्तव्य असल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
महापालिका रुग्णालयांतील दुर्घटना -
पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राजेश मारु या ३२ वर्षीय तरुणांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ८ ऑक्टोबरला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल शांताबेन जाधव या महिलेचा पाय आणि प्रमिला नेरुळकर या महिला रुग्णाचाही डोळा उंदराने चावल्याचे प्रकरण गाजले होते. तसेच जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात ४ जानेवारी रोजी डोळ्यांमध्ये लेन्स लावण्याची सात जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये पाच जणांचे डोळे निकामी झाले. आता केईएम रुग्णालयात आठवडाभरापूर्वी 'प्रिन्स' या चार महिन्याचा हात निकामी झाला आहे. परवणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळते. महापालिका रुग्णालयात त्यामुळे देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. मात्र, महापालिका रुग्णायलांतील दुर्घटना वाढीस झाल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.