मुंबई - नळ बाजारातील हुसेन भाई मेंशन या चार मजली इमारतीला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत ९ बाईक आणि एक मारुती इको कार अशी दहा वाहने जळून खाक झाली. पहाटे सात वाजता आगी पूर्णतः विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
गोळ देऊळ एसव्हीपी रोडवरील नळ बाजार येथील हुसेन भाई मेंशन या इमारतीत शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास आग लागली. लाकडी सामान, दरवाजे, खिडक्या, दुकानांचे फलक, पडदे आदी जळावू साहित्यामुळे ९ मिनिटातच आगीने रौद्र रुप धारण केले. पहाटे अचानक लागलेल्या आगीमुळे हाहाकार माजला आणि एकच धावपळ उडाली. सर्वत्र धुरांचे लोट पसरले. आगीने तोपर्यंत तिसऱ्या मजल्याला वेढले. यावेळी इमारत परिसरातील ९ बाईक आणि कार जळून खाक झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने ४ फायर इंजिन, ४ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी आग पूर्णतः विझविण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.