मुंबई: शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज, गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. उद्धव यांचा शपथविधी रोखण्यात यावा, या मागणीची याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपनं निवडणूकपूर्व युती केली होती आणि त्यांनीच सरकार स्थापन करायला हवं, असं याचिकेत नमूद केलं आहे. मात्र, न्यायालयाच्या दोन वेगवेगळ्या खंडपीठांनी या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात असंवैधानिक असं काय आहे, असा सवाल खंडपीठानं उपस्थित केला. भाजप-शिवसेना युतीचं सरकार यावं यासाठी मतदान केलेल्या मतदारांचा हा विश्वासघात आहे, अशी बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.
दरम्यान, शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान की मनोरंजनाचे ठिकाण या वादासंदर्भात 'वेकॉम ट्रस्ट' संस्थेची जनहित याचिका २००९पासून प्रलंबित आहे. योगायोगाने ही याचिका काल, बुधवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली. त्यावेळी शपथविधीला शिवाजी पार्कमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होणार असल्याने सुरक्षिततेविषयी खंडपीठाने चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर शिवाजी पार्कच्या वापराविषयी धोरण निश्चित झालेले असताना असे कार्यक्रम होण्याची प्रथा त्याठिकाणी पडू नये, अशी चिंताही खंडपीठाने व्यक्त केली. 'असे समारंभ वारंवार होण्याचे चित्र शिवाजी पार्कविषयी होऊ नये. अन्यथा प्रत्येक जण अशी परवानगी मागण्यासाठी येऊ लागेल', असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच शपथविधी सोहळ्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सरकारी प्रशासनांना सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घ्यावी लागेल, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.