नवी दिल्ली - स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ५ वर्षांआधीच ओळखता येणे शक्य आहे असे ब्रिटनमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे. ही तपासणीची नव्या पद्धतीच्या निर्मितीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकला तर याचा लाभ लवकरच लोकांना घेता येणार आहे. संशोधकांच्या मते, स्तनाच्या कर्करोग तपासणीची ही सोपी पद्धत येत्या चार ते पाच वर्षांत उपलब्ध होईल. ब्रिटनमधील राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने कर्करोग परिषद ग्लासगो येथे हे संशोधन सादर केले होते.
डॉक्टरांनी स्तनांच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ९० रुग्णांच्या रक्ताचे नमुने आणि ९० पूर्णपणे निरोगी रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. आता संशोधक ८०० रुग्णांचे नमुने घेऊन त्यांची ९ वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी घेत आहेत. यामुळे मागील संशोधनाच्या अचूकतेची पुन्हा चाचणी केली जाऊ शकणार आहे. नव्या पद्धतीच्या रक्त चाचणीच्या माध्यमातून स्तनाचा कर्करोग सुरवातीलाच ओळखणे लोकांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. शिवाय स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीच्या इतर चाचण्यांपेक्षा ही चाचणी अधिक सोपी असेल नॉटिंघम विद्यापीठातून पीएचडी केलेली विद्यार्थिनी दनिया अल्फतानी हिने म्हटले आहे. आम्हाला या संशोधनावर अधिक काम करण्याची आणि ते आणखी विकसित करण्याची आवश्यकता आहे, असेही अल्फतानी म्हणाल्या. स्तनाचा कर्करोग होण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखली जाऊ शकतात स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. एकदा आम्ही या संशोधनाच्या अचूकतेत सुधारणा केल्यानंतर हे शक्य होणार आहे. यामुळे एका साध्या रक्त तपासणीमुळे स्तनाचा संभाव्य कर्करोग ओळखला जाऊन त्यावा अटकाव केला जाऊ शकतो, असे त्या पुढे म्हणाल्या.