मुंबई, : साकीनाका जंक्शन ते कमानी जंक्शन पर्यंतचा कुर्ला - अंधेरी रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. नवनिर्वाचित आमदार दिलीप लांडे यांनी सहायक आयुक्त भरत मराठे यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर मराठे यांनी आश्वासन दिले असल्याचे लांडे यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षापासून कुर्ला - अंधेरी रस्त्यांचे काम प्रलंबित राहिल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी आमदार दिलीप लांडे यांनी सहायक आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे.
या रस्त्याचे तीन फेजमध्ये काम होणार आहे. पहिल्या टप्पात बैलबाजार ते सफेद पूल नाला, दुसरा टप्पा सफेद पूल ते साकीनाका आणि बैलबाजार ते कमानी- एल बी. एस रोड पर्यंत साधारण ७० फूट रस्ता प्रस्तावित आहे. या संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर विभागातील नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटणार होणार आहे.
दरम्यान यामध्ये बाधित गाळेधारक व रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असून गाळेधारक व रहिवाशांच्या पुनर्वसनांनंतरच रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, उपजिल्हाधिकारी अतिक्रमण व निर्मूलन देविदास चौधरी, सहायक अभियंता पालवे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.