मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी बेस्ट उपक्रमातर्फे विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्या खर्चात यंदा तीन लाख रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सोमवारी बेस्ट समितीसमोर मांडण्यात आला.
बेस्ट उपक्रमाकडून शिवाजीपार्क येथील चैत्यभूमीवर ५ अणि ६ डिसेंबर रोजी अखंड वीज पुरवठा, जादा बससेवा, प्रथमोपचार, वैद्यकीय सेवा केंद्र, नेत्र तपासणी, चष्मे वाटप आदींची सुविधा पुरविली जाते. त्यासाठी उपक्रमाकडून १० लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. त्यात यंदा तीन लाख रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर समितीतील शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सर्वसमावेशक असावा. तसेच निधीची तरतूद १३ ऐवजी १५ लाख करण्याची उपसूचना केली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या १७ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्याचीही मागणी केली. तर, महापरिनिर्वाणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विविध पुस्तके, ग्रंथ भेट म्हणून देण्यात यावेत, अशी सूचना भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.