मुंबई - शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, या भूमिकेतूनच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत,' अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी संभाव्य आघाडीबद्दल बोलताना दिली. 'जात-धर्माचं राजकारण संपवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला त्यांच्यापासून वेगळं काढणं गरजेचं आहे असेही ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून राज्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांकडं पुरेसं बहुमत असलं तरी छोट्या घटक पक्षांशी सल्लामसलत करण्याची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीनं घेतली आहे. त्यामुळं या पक्षांचे नेतेही आपापली मतं मनमोकळेपणे मांडत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही नव्या आघाडीबद्दल व मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यांची मतं मांडली. 'मोठ्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी आम्ही छोट्या शत्रूला जवळ केलं आहे. शिवसेनेला आम्ही पाठिंबा दिला नाही तर ते भाजपसोबत जाऊन सरकार बनवतील. ते आम्हाला नको आहे. देशात जाती-धर्माचं राजकारण संपलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शिवसेना बदलायला तयार असेल तर स्वागतच आहे. त्यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमावर काम करायला काहीच हरकत नाही. मुस्लिम समाजाचे काही प्रश्न आहेत, ते आम्ही आघाडीच्या नेत्यांपुढं मांडले आहेत. नव्या सरकारकडून ते मार्गी लागतील,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिवसेनेत खल सुरू असतानाच आघाडीतील घटक पक्षांनीही आपापली पसंती सांगायला सुरुवात केली आहे. अबू आझमी यांनी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. 'उद्धव ठाकरे हे सौम्य स्वभावाचे नेते आहेत. मुस्लिमांबद्दलची त्यांची भूमिका आक्रमक नाही. त्यामुळं अन्य कोणत्याही नेत्याऐवजी त्यांनी सरकारचं नेतृत्व केल्यास चांगलं होईल,' असं आझमी म्हणाले.