मुंबई - देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड निर्माण करणाऱ्या ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती ठरणार आहेत.
आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.