मुंबई - मुंबईच्या ७७ व्या महापौर पदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौर पदी ऍड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विद्यमान महापौर पेडणेकर यांच्या नावाची शुक्रवारी महासभेत घोषणा केली. दरम्यान, शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडला.
राज्यातील सत्तासंघर्षाचे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडुकीतही बदलाचे वारे वाहतील, अशी चर्चा असताना भाजपने ऐनवेळी माघार घेतली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाचे कारण पुढे करत उमेदवार दिला नाही. यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येकी एकच अर्ज आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. शुक्रवारी महासभेत या दोन्ही पदांची जाहीररीत्या घोषणा करण्यात आली. महापौर पदी किशोरी पेडणेकर यांची माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी निवड केली. तर विद्यमान महापौरांकडून उपमहापौर पदी सुहास वाडकर यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन -
महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 'शिवसेना जिंदाबाद', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'कोण आला, रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला', अशा जोरदार घोषणांनी सभागृह दणाणून सोडला. नगरसेवकांनी भगवे फेटे आणि उपरणे परिधान करून महासभेत आले होते. तसेच महापालिका मुख्यालयात भागात मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावण्यात आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी देखील भगवी वस्त्रे, उपरणे, हातात झेंडे घेऊन महापालिका मुख्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवेमय झाला होता. पारंपरिक वाद्यांच्या तालावर यावेळी अनेकांनी ठेका धरला होता.