मुंबई - पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध न घेतल्याने तिच्या वडिलांनी आत्महत्या करावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको करत दगडफेक केली. यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
चेंबूर येथे ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणारी एक मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणात नीट लक्ष न घातल्याने तिचा शोध न लागल्यामुळे या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आज दुपारी या व्यक्तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला चेंबूर परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. मुलीच्या वडिलांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याने अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्तारोको केला. त्यामुळे अंत्ययात्रेला आलेल्या जमावामध्ये एकच धावपळ उडाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. काही वेळातच सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यावेळी जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली. यावेळी दोन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या जमावाने या पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला चढवला. जमावाने पोलिसांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात हे दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.