शिवसेनेच्या १४ बंडखोरांची हकालपट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2019

शिवसेनेच्या १४ बंडखोरांची हकालपट्टी


मुंबई - शिवसेनेने नांदेड, हदगाव, चंदगड, बुलडाणा आदी १४ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १९ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र यात मुंबई मधील वांद्रे पूर्व, कल्याण पूर्व, वर्सोवा येथील बंडखोरांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर शिवसेनेमध्ये तिकिट न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात तर काही ठिकाणी युतीमधील मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. मंगळवारी १४ विधानसभा मतदारसंघांतील बंडखोरांची शिवसेनेने हकालपट्टी केली. यात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रकाश कौडगे, हदगाव विधानसभा मतदारसंघातील बाबूराव कदम कोहळीकर, सोलापूर मध्यमधील महेश कोठे, मोहोळ विधानसभेतील मनोज शेजवळ, चोपडामधील कैलास पाटील व इंदिरा पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अण्णासाहेब माने व संतोष माने, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विजयराज शिंदे, सिंधुताई खेडेकर, अर्जुन दांडगे, चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनिरुद्ध रेडेकर, कोल्हापूर उत्तर मधील कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगराज, हातकणंगलेमधील संदीप दबडे, सिंदखेडमधील शानाभाऊ सोनवणे, जिंतूरमधील राम पाटील, पाथरीमधील डॉ. संजय कच्छवे आणि केज विधानसभा मतदारसंघातील अॅड. विशाल होबळे यांचा समावेश आहे.

मातोश्रीच्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी, कल्याण पूर्व भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, वर्सोवामध्ये शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजुल पटेल आदींनी बंडखोरी केलेली आहे. याशिवाय, घाटकोपर पश्चिम, कणकवली आदी ठिकाणीही बंडखोरी झालेली आहे. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप कारवाई झालेली नसल्याने त्यांच्यासंदर्भात शिवसेना काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे.

Post Bottom Ad