मुंबई, १९ ऑक्टोबर २०१९ :- राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदानसंघात २८ 'महिला व्यवस्थापित मतदान केंद्र' निर्माण करण्यात येणार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून त्यांना लोकशाही प्रक्रियेत समान वाटा देण्याच्या उद्देशाने ही महिला मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून त्यांना सखी मतदान केंद्रे असे संबोधित करण्यात येणार आहे. या सखी मतदान केंद्रांमध्ये निवडणूक कार्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील महिलाच असणार आहेत.
सखी मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांचे स्वागत कोकणातील महिला बचतगटांनी तयार केलेले खास कोकम सरबत देऊन करण्यात येणार आहे. तसेच महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ही मतदान केंद्रे रांगोळी, पोस्टर्सनी सजविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयातील स्वीपच्या समन्वय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांपैकी प्रत्येक मतदारसंघातून एक मतदान केंद्राची निवड केली जाणार असून मालाड पूर्व आणि शिवाजीनगर मानखुर्द येथे आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन सखी मतदान केंद्र असतील. लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वोच्च अधिकार बजाविणाऱ्या महिला मतदारांना या केंद्रांवर बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्या भेट देण्यात येणार आहे. महिलांकरिता आणि महिलांमार्फत चालविण्यात येणारी ही सखी मतदान केंद्रे लोकशाहीच्या तत्त्वाचे अनुपालन करणारी ठरणार आहेत, असे मत मुळे यांनी मांडले.
मतदारसंघ आणि मतदारसंख्या यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबईतील सर्वात मोठा जिल्हा आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघात ७२ लाख ६३ हजार २४९ मतदारांपैकी ३३ लाख १५ हजार ३३६ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांनी सांगितले आहे की मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय कटिबद्ध असून त्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकटीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात सक्रिय योगदान दयावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.