मुंबई - महाराष्ट्रातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला अतिशय स्पष्ट बहुमत दिले आहे. मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.
भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ नेते राम नाईक, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्षाचे नेते आ. विनायक मेटे या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीला दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल आपण महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. जनतेने महायुतीला राज्यात स्पष्ट कौल दिला आहे. या यशात भारतीय जनता पार्टीला साथ दिलेल्या महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचाही वाटा आहे. या बद्दल महायुतीतील मित्रपक्षांनाही मी धन्यवाद देतो.
या निवडणुकीतील विजय अनेक अर्थांनी वेगळा आहे. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने २६० जागा लढविल्या होत्या. त्या पैकी १२२ जागांवर भाजपाला यश मिळाले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षांसह १६४ जागा लढविल्या. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशाची टक्केवारी ७० टक्के एवढी आहे. राज्याच्या सर्व भागातील जनतेने आम्हाला समर्थन दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा आणि परळी विधानसभा मतदार संघातील निकाल धक्कादायक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महायुतीच्या कामगिरीवर बंडखोरांमुळे परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढले. निवडून आलेल्या १५ अपक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असून त्यांचा पाठिंबा महायुतीला मिळणार आहे. या पुढे आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
तत्पूर्वी भाजपा प्रदेश कार्यालयात महायुतीच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जनतेच्या आशा आकांक्षांची पूर्तता करण्याचे काम महायुतीचे सरकार करेल.