बेस्टला २२४९ कोटींची तूट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2019

बेस्टला २२४९ कोटींची तूट


मुंबई - बेस्टकडून परिवहन आणि विद्युत असे दोन विभाग चालविण्यात येत असून, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तुटीचा आकडा २,२४९ कोटी ७४ लाख रु.वर पोहोचला आहे. या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचे उत्पन्न १,४९५ कोटी रु. आणि खर्चाची बाजू ३,८४५ कोटी रु. इतकी दाखविली आहे. विद्युत पुरवठा विभागाचे उत्पन्न ४,०६३ कोटी रु. आणि खर्चाचा आकडा ३,९६३ कोटी दर्शविण्यात आला आहे. या अंदाजित अर्थसंकल्पात परिवहन विभागाची तूट २,३४९ कोटी रु. इतकी अपेक्षित आहे. विद्युत विभागास सुमारे ९९ कोटी रु. इतका नफा अपेक्षित असताना परिवहन विभागाचा तोटा दोन हजार २४९ कोटींवर जाण्याची भीती आहे.

बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी १० ऑक्टोबर रोजी अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. पण, आचारसंहितेमुळे हा अर्थसंकल्प सीलबंद होता. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आजच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बेस्टच्या परिवहन विभागातील तूट ही प्रामुख्याने भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससेवांसाठी गृहीत धरली आहे. तत्कालीन स्थितीत बेस्टच्या परिवहन विभागाच्या तोट्याची रक्कम २,२०० कोटी रु. आहे. २०१८ ते २०१९ कालावधीत बेस्टचा तोटा ३८० कोटी रुपयांच्या आसपास होता. हा तोटा २०१९-२० मध्ये ८३३ कोटी रुपयांवर गेल्याने बेस्टची आर्थिक स्थिती आणखीनच खालावली. मुंबई पालिकेने बेस्टला आर्थिक मदत दिल्यानंतर उपक्रमाची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. बेस्टने तिकिटांमध्ये कपात केल्याने प्रवासी वाढले आहेत. पण दैनंदिन उत्पन्न कमी होत चालले आहे. आता बेस्टला १०० रुपयांच्या खर्चापोटी फक्त ३५ रुपये उत्पन्न मिळत आहे. २०१९ मध्ये उत्पन्न ५९ कोटी, तर खर्चाची रक्कम १७१ कोटी रुपयांवर गेली.

Post Bottom Ad