निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.
निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल -III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.
अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक -
नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.