मुंबई - ग्रॅन्टरोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारी अंधेरीतील पेनिन्सुला या व्यावसायिक २२ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आगीची घटना घडली. ही आग क्षणात १२ मजल्यापर्यंत पोहचल्याने जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाला शर्तीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या ४० ते ५० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
अंधेरीतील वीरा देसाई मार्गावरील पेनिन्सुला पार्क ही २२ मजली व्यावसायिक इमारत आहे. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागली. व्यावसायिक इमारत असल्याने येथे काम करणारे कर्मचारी कामात व्यस्त होते. आग लागल्या घटना समजताच इमारतीतील कर्मचा-यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. अनेकांनी इमारतीबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या लोळासह धुराचे लोट पसरल्याने लोकांना काय करावे कळत नव्हते काहींनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या ४० ते ५० जणांची सुटका केली. काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास सुरु असल्याचे दलाकडून सांगण्यात आले.