
मुंबई - मतदानाला अवघे तीन दिवस उरलेले असताना मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्यावर आदित्य ठाकरे यांनी भर दिला आहे. आज पहाटेच आदित्य यांनी वरळी सीफेसवर जाऊन मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांशी हस्तांदोलन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबईसह वरळीच्या विकासाबाबतच्या मतदारांच्या कल्पनाही त्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्यांच्याकडून लोकांच्या असलेल्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर राज्यात सत्ता आल्यावर आरे कॉलनीला जंगल घोषित करण्याचं वचनही या मतदारांना दिलं.
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आदित्य यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. त्यात मेट्रो रेल्वे, वरळी कोळीवाडे आणि आरे कॉलनीच्या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी आदित्यसोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांची एकच झुंबड उडाली होती. दरम्यान, ठाकरे घराण्यातील निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे हे पहिलेच आहेत. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मनसेने वरळीत उमेदवार न दिल्याने आदित्य यांचा विजय सोपा असल्याचं मानलं जात आहे.