मुंबई, दि. 19 – विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्ह्यात दि. 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिल्या आहेत.
जोंधळे म्हणाले की, खाजगी आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आस्थापनातील अधिकारी/कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत. याची संबंधित आस्थापनांनी नोंद घ्यावी आणि सर्व खाजगी आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. याची सर्वांनी दक्षता घ्यावी असेही जोंधळे यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील आस्थापनांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर त्यांनी 2 ते 3 तासाची सवलतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाच्या दिवशी खाजगी आस्थापना सुरू ठेवण्यासाठी दिनांक 18 ऑक्टोवर, 2019 पर्यंत 65 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी फक्त दोन आस्थापनामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित सर्व आस्थापनांना सेवा सूरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी नाकारली आहे.