मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. सरासरी 60.46 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सन 2014च्या तुलनेत यावेळी मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मतटक्का घसरला असून, मुंबई उपनगरांमध्ये मात्र मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.
सन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 63.13 टक्के मतदान झाले होते, यावेळी त्यात घसरण झाली असून 60.46 टक्के मतदान झाले. राज्यात 8,97,22,019 मतदारांपैकी 5,42,43,974 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. 2014 मध्ये 63.08 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी 8,35,28,310 मतदारांपैकी 5,26,91,758 मतदारांनी मतदान केले होते.
मुंबई शहरात देखील सन 2014 मध्ये 54 टक्के मतदान झाले होते, तर यावेळी मतटक्का 48.63 वर घसरला आहे. मुंबई उपनगरांमध्ये मात्र 2014च्या तुलनेत मतटक्का वाढल्याचे दिसत आहे. सन 2014 मध्ये उपनगरांमध्ये 50.16 टक्के मतदान झाले होते, यावेळी 51.17 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहर विभागातील 25,09,453 मतदारांपैकी 12,20,444 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला. मुंबई उपनगर विभागात 51.17 टक्के मतदान झाले. 72,63,249 मतदारांपैकी 37,16,944 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात करवीर ८३.२० टक्के, शाहूवाडी ८०.१९ टक्के, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ टक्के या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान झालेले पाच मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईतील कुलाबा ४०.२० टक्के, उल्हासनगर ४१.२१ टक्के, कल्याण ४१.९३ टक्के, अंबरनाथ ४२.४३ टक्के आणि मुंबईतील वर्सोवा ४२.६६ टक्के.