राज्य उत्पादन शुल्क, ठाणे कार्यालयाचे अधीक्षक नितीन घुले, पालघर कार्यालयाचे अधीक्षक डॉ.व्ही. टी. भुकन आणि त्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी अवैध ताडीसाठ्यावर छापे घातले. यामध्ये राजू म्हात्रे या व्यक्तीच्या घराजवळ विनापरवाना सुमारे 2275 लिटर ताडीसाठ्याचे कॅन आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजू म्हात्रे फरार झाला. त्यास दारुबंदी गुन्ह्यामध्ये फरार घोषित करण्यात आले. नाळा गावातील ताडीमालक विरेंद्र रवींद्र म्हात्रे हा छापा पडू नये म्हणून आपल्या घराजवळील ताडी टेम्पोमध्ये (क्र.एमएच-48-टी-4648) 35 लिटरचे 20 कॅन भरत असताना त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
जप्त करण्यात आलेली ताडी ही फार दिवसांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दोन्ही आरोपी हे बऱ्याच दिवसांचा शिळा ताडीसाठा करुन मुंबई-ठाणे परिसरात बेकायदेशीर ताडीची विक्री करतात. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याने व विरेंद्र म्हात्रेला अटक झाल्यामुळे वसई परिसरात दसऱ्याच्या दिवशी सर्व बेकायदेशीर ताडीवाल्यांना कठोर कारवाईचा संदेश दिला गेला आहे.
नवापूर येथे प्रदीप डोंगरीकर याच्या घरीदेखील दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा घातला असता 24 तासांपेक्षा जास्त कालावधीची 325 लि. ताडी आढळून आली. हा शिळी ताडी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ व कांदिवली पोयसर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील चौपाटी वाळकेश्वर येथील दुकानात पाठविण्यात येत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे या पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.
गतवर्षीही ताडी दुकानदारांवर केलेल्या कारवाईत 24 तासांपेक्षा अधिक शिळ्या ताडीचा साठा केलेल्या मुंबई आणि ठाणे येथील 13 दुकानदारांवर विभागीय गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये मुंबई उपनगरमधील ताडी दुकाने 15 दिवसांसाठी बंद केली होती.