महायुतीचे भक्कम सरकार लवकरच स्थापन करणार – मुख्यमंत्रीमुंबई - भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी मुंबईत एकमताने भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. राज्यातील मतदारांनी भाजपा शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासासाठी जे काम केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षांत करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नेता निवडीसाठी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर, आ. रामदास आंबटकर आणि सुरेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीने मते मागितली आणि जनतेने महायुतीला आशिर्वाद दिला. महायुतीला स्पष्ट जनादेश असून लवकरच महायुतीचे भक्कम सरकार स्थापन होईल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी उपस्थित आमदारांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी साथ दिल्याबद्दल आभार मानले.
त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत समाजाच्या सर्व घटकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केला. आपले प्रश्न हेच सरकार सोडवू शकते, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला. गेल्या पाच वर्षांत केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षात करायचे आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतीला पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विकास हे आपले प्राधान्याचे विषय असतील.
चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आशिष शेलार या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी अनुमोदन दिले.