मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भव्य रॅली काढत वरळी विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच एखादी व्यक्ती थेट निवडणूक लढवत असल्याने सगळ्यांच्या नजरा आदित्य यांच्याकडेच होत्या. यानिमित्ताने ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या संपत्तीची अधिकृत आकडेवारीही सर्वांसमोर आली. ठाकरे कुटुंबातील व्यक्तींच्या संपत्तीबद्दल आतापर्यंत केवळ अंदाजच व्यक्त करण्यात येत होते. आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये बँकेत १० कोटी ३६ लाख रुपयांच्या ठेवी, बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजार रुपये गुंतवणूक, ६ लाख ५० हजार रुपये मूल्याची एक बीएमडब्ल्यू कार, ६४ लाख ६५ हजारांचे दागिने, इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आदित्य यांनी अर्ज भरण्याआधी वरळीतून रॅली काढली. या रॅलीत हजारो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी रॅलीला सुरूवात केली. उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.