मुंबई - राज्यात मतदानाच्या दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात ३ हजार ४४५ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्या. तर, प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी पाच ते सहापर्यंत ४ हजार ६९८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यांचे प्रमाण ०.५९ ते ३.५६ टक्क्यांच्या दरम्यान आहे. तसेच निवडणुकीचे काम करताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. याची माहिती देण्यासाठी बलदेव सिंग यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बलदेव सिंह यांनी अशी माहिती दिली. यावेळी बोलताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल ३६१ तक्रारी आल्या होत्या. त्यात काँग्रेस १५२, शिवसेना ८९ आणि इतर पक्षांच्या १२० तक्रारी होत्या. त्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता भंग - २ हजार गुन्हे -
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याबद्दल २ हजार १२४ गुन्हे दाखल झाले असून, प्रतिबंधक कायदा व अन्न व औषधे कायद्याखाली ११ हजार ५०६ गुन्हे दाखल झाले आहेत. आयकर विभाग, अबकारी विभाग आणि पोलिस यांनी ६७ कोटी ५२ लाख रुपयांची रोकड, ५४ कोटी ५० लाखांचे सोने, २३ कोटी २१ लाख रुपयांची दारू आणि २० कोटी ७५ लाख रुपयांचे मादक व अंमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यांची एकूण रक्कम १६५ कोटी ९९ लाख रुपये इतकी आहे असे त्यांनी सांगितले.
दोन जणांचा मृत्यू -
निवडणूक मतदान प्रक्रियेच्या काळात कोल्हापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर, ठाण्यातील रामबाग येथील नूतन शाळेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी जयराम तरे यांना हृयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीचा धोका आता टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.