जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2019

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे


मुंबई, दि. 24 : येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर व उपनगरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मुंबईची मतदान टक्केवारी वाढवावी, असे संयुक्त आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क तसेच जयहिंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमात मतदारांशी संवाद साधताना केले.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरातील यॉट क्लब येथे आयोजित या कार्यक्रमास व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क या संस्थेचे विश्वस्त तथा राज्याचे माजी मुख्य सचिव व्ही.रंगनाथन, अध्यक्षा इंद्राणी मलकानी, निवडणूक दिव्यांग सदिच्छादूत निलेश सिंगीत तसेच मुंबई शहरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जोंधळे यांनी उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली तसेच त्यांनी मुंबई शहरातील मतदान सुविधा व इतर अनुषंगिक माहिती देऊन नवमतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन निवडणूक टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी मतदान केंद्र प्रथम, द्वितीय मजल्यावरुन तळमजल्यावर स्थलांतरित केल्याचे सांगितले. पीडब्ल्यूडी व सी व्हीजील ॲपबाबतही सविस्तर माहिती दिली.

निर्भय, नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणूक संपन्न होत असून यावेळी मतदान टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी बोरीकर यांनी व्यक्त केली. देशातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा असलेला हा जिल्हा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूक अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेची सविस्तर माहिती दिली. 1999 ला मतदान अधिकारी ते 2019 ला जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवास आपण केला असल्याने निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांच्या संदर्भात सहानुभूती असल्याचे बोरीकर यांनी सांगितले.

मुकादम यांनी दिव्यांग तसेच पीडब्ल्यूडी मतदारांसाठी कोणत्या सुविधा राबविण्यात येत आहे याची सविस्तर माहिती देऊन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कसे पाहावे याची तांत्रिक माहिती दिली. तसेच व्हीव्हीपॅट संदर्भातील प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. सदिच्छादूत सिंगीत यांनी राज्यातील तसेच मुंबईतील मतदान केंद्रे जास्तीत जास्त तळमजल्यावर आणल्याबद्दल निवडणूक यंत्रणेचे मन:पूर्वक आभार मानून आनंद व्यक्त केला. दिव्यांगांना मदत करणाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे, असेही त्यांनी सूचित केले.

यानंतर झालेल्या समक्ष व ऑनलाईन प्रश्नोत्तराच्या वेळी बोगस मतदान, मतदान ओळखपत्र, हौसिंग सोसायट्यांची जबाबदारी, निवडणूक यंत्रणा जबाबदारी, ईव्हीएम संदर्भातील प्रश्न, उपप्रश्न आदींबाबत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जिल्हाधिकारी द्वयांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, मुंबई शहरचे निवडणूक तहसिलदार श्री.सावंत, मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad