अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदारयादीतील क्रमांक शोधण्यात वेळ जातो. त्यामुळे मतदान स्लिप मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी ऑनलाईन मतदार माहिती मिळविण्याची सुविधा दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
यामध्ये राज्य, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदाराचे संपूर्ण नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मतदार ओळख क्रमांक, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदाता क्रमांक, मतदाराचे भाग क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आदी माहिती छापलेली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात आली आहे. ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.