मुंबई - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभा निवडणूकीस पराभूत झाले. आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. तसेच राज्यात कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी ते पराभूत होतील, असेही तावडे यांनी नांदेड येथे सांगितले.
विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपच्या वतीने राज्यामध्ये सात विभागीय केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज नांदेड व औरंगाबाद येथील विभागीय माध्यम केंद्रांना भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होते.
राज्यात शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती लोकसभेप्रमाणेच यावेळीही मिळणार, त्यामुळे गतवेळेस पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील. काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी झाली असून, वंचित बहुजन आघाडी हा आगामी विरोधी पक्ष असेल, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिल्ह्यात वाताहत झाली. आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये आणि आपली उरली सुरली पत घालवू नये, असा सल्ला आपण देत आहोत, असेही तावडे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले, तरी ते पराभूतच होतील, असे भाकीतही तावडे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखविला त्याप्रमाणेच या निवडणुकीत मतदार महायुतीसोबत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी अनेकांनी हडप केल्याची माहिती पुढे येत असून, याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत. सबळ पुरावे आणि माहिती समोर आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करु, असे तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महाराष्ट्रात सात विभागीय माध्यम केंद्र उभारण्यात आली असून, प्रत्येक विभागीय केंद्रांच्या विभागांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांसाठी माध्यमांशी संबंधित काम या माध्यम केंद्रांच्या मार्फत केले जाणार आहे. प्रत्येक विधानसभेतील दैनंदिन घडामोडींची माहिती गोळा करण्यात येईल. विधानसभेतील जिल्हा परिषद सर्कलमध्ये किंवा पंचायत समितीपर्यंत एखादा मुद्दा उपस्थित झाल्यास, त्याची चर्चा सोशल मिडीयावर करण्यात येते. या चर्चेमधील वस्तुस्थिती बूथलेवलपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था माध्यम केंद्रामार्फत करण्यात येईल. ही सातही माध्यम केंद्रे राज्यातील माध्यम केंद्रांशी जोडली जातील, असेही तावडे यांनी सांगितले.
सध्या निवडणूक प्रचाराचे तंत्र बदलले आहे. आता निवडणूक प्रचार हा वृत्तपत्रापासून डिजीटल मिडीया पर्यंत अतिशय व्यापक स्वरुपात करण्यात येतो. मिडीयावर करण्यात येणारा नकारात्मक प्रचारातील चुकीची माहिती दुरुस्त करुन सदर माहिती योग्य पध्दतीने पोहचविण्याचे काम भाजपच्या माध्यम केंद्रांमार्फत राज्यात केले जाणार आहे. नांदेड मधील माध्यम केंद्र हे नांदेड, लातूर, उस्मानाबाद या परिसरातील विधानसभा मतदारसंघांसाठी काम करेल, असेही तावडे यांनी सांगितले.