मुंबई – गणपती विसर्जनानंतर वंचित बहुजन आघाडी पहिली यादी जाहीर करणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच आमचा फूटबॉल होऊ नये म्हणून आम्ही कॉंग्रेसशी युती करण्यास इच्छीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘जे जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन चालणार, असे म्हणत निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत एमआयएमशी युती कायम असेल’, असेही त्यांनी यावेळी म्हटले. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेस 3-4 महिने आम्हाला खेळवत राहिली आणि युती टाळली. आता युतीच्या भानगडीत पडणार नसून आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे. यापुढे जे कुणी येतील त्यांना सोबत घेऊ. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही कोणता फरक झालेला नाही. काँग्रेस आताही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही बोललो. त्यातून काहीही हाती लागले नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही. आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. यापुढे वेळ फार कमी आहे. त्यामुळे निवडणूक वेळापत्रक लक्षात घेता आम्हाला प्रचारासाठीही वेळ हवा आहे.