मुंबई : मेट्रो कारशेडसाठी गोरेगावच्या आरे वसाहतीतील अडीच हजार झाडे तोडून या ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्यात येणार असून, त्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यामुळे चांगलेच रान पेटले आहे. मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांनी आरे वाचवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या आंदोलनाने गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना या आंदोलनात सामिल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोरेगावच्या आरे वसाहतीतील २७०३ झाडे मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, त्यासाठी पालिका प्रशासन घाईने कार्यवाही करत आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नागरिकांना विकासकामासाठी आवाहन केले असले तरी मुंबईकरांनी त्यांचे आवाहन झुगारून लावले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांनी भरपावसात मानवी साखळी करून मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांना हात लावू नये, यासाठी त्यांनी आंदोलन केले आहे. मुंबईतील काही सेलिबे्रटींनीदेखील झाडे तोडण्यासाठी विरोध दर्शवला आहे. रविवारी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनादेखील नागरिकांनी घेराव घालून 'आरे वाचवा' अशी मागणी केली. काही आंदोलकांनी आरे हे जंगल वाचवा असे म्हटल्याने कीर्तीकर यांनी आरे हे जंगल नाही, असा टोला लगावत आंदोलनकर्त्यांना शिवसेनेची भूमिका समजावून सांगितली. वृक्षतोडीला शिवसेनेचाही विरोध असून आम्ही सर्वच पातळीवर त्याचा विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्याला मुंबईकरांनी उचलून धरल्याने सत्ताधारीदेखील चिंतेत असून, यावर कसा तोडगा काढायचा यासाठी त्यांनी विचारविमर्श चालवला आहे. दरम्यान, वृक्षतोडीविरोधात सामाजिक संस्था न्यायालयात गेली असून त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.