मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या छोट्या ठेवीदारांचे संरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्या साठी आपण केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर व रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सोमय्या म्हणाले की, या बँकेने दिवाळखोरीकडे निघालेल्या एका उद्योग समूहाला वारेमाप कर्जे दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या बँकेच्या छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्या साठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. या बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा आज वाढविण्यात आली आहे . ही मर्यादा एक लाख रु. पर्यंत वाढविण्याची मागणी आपण केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. आपली ही मागणी लवकरच मान्य होईल, अशी आशाही सोमय्या यांनी दिली.
सोमय्या म्हणाले की, या बँकेत अनेक छोट्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहोत. छोट्या गुंतवणूकदारांना अधिकाधिक पैसे काढण्याची परवानगी मिळावी या साठी आपण रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना अनेक पर्याय दिले आहेत.