गेले काही दिवस पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढले. कधी मुसळधार, सरीवर सरी तर कधी रिपरिप पावसाने ठेवल्याने मुंबईकरांची धावपळ उडाली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत कामावरून घरी परतावे लागल्याने मुंबईकरांचे हाल झाले. त्यामुळे कधी एकदाचा हा पाऊस थांबतो अशा प्रतिक्रिया मुंबईकरांकडून उमटत होत्या. पण, आता एकाएकी पाऊस थांबल्यानंतर हवेतील गारवा देखील नाहीसा झाला आहे. सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरवासियांना उकाड्याला सामोरे जावे लागले. आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या कुलाब्यातील तापमान ३० अंश सेल्सिअस एवढे होते. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे घामाच्या धाराही लगेच सुरू झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. पावसाने यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून सुरूवात केली. पावसाची हजेरी कायम राहत गणेशोत्सवापर्यंत पावसाने मुंबईसह राज्यात जोरदार धुमाकूळ घातला. गेल्या शुक्रवारी गडगडाटासह पडलेला पाऊस हा परतीचाच असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
तापमान -
सांताक्रूझ येथे रविवारी ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक आहे. कुलाबा येथे रविवारी ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.