मुंबई - 21 व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (मोबिलिटी), संपर्क (कनेक्टीव्हिटी), उत्पादकता (प्रोडक्टिव्हिटी), शाश्वतता (सस्टेनबिलिटी) आणि सुरक्षा (सेफ्टी) याला प्राधान्य देत आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या 5 वर्षात देशात पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातील मोठा वाटा महाराष्ट्राला मिळेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
बांद्रा कुर्ला संकुलातील कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रो मार्ग 10, 11 आणि 12 या तीन मेट्रो मार्गिकांचे तसेच मेट्रो भवनचे भूमिपूजन, मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण, बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले. यावेळी महामुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, विपरीत परिस्थितीत यश कसे मिळवायचे हे आपण सर्वांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकले पाहिजे. खरे तर कोणतेही लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करणारे तीन प्रकारचे लोक असतात. पहिले जे काम सुरूच करत नाहीत. दुसरे काम सुरू करतात पण अडचण आल्यावर काम सोडून पळतात तर तिसऱ्या प्रकारचे लोक लक्ष्य गाठण्यासाठी निरंतर प्रयत्न करतात. इस्त्रोचे शास्त्रज्ञ हे तिसऱ्या प्रकारात येत असल्याने मला विश्वास आहे की चंद्रावर पोहचण्याचे आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
मोदी म्हणाले, भारतात जवळपास 30 ते 35 वर्षांपूर्वी पहिली मेट्रो सुरु झाली. त्यानंतर 2014 नंतर आज देशभरात 27 शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. यामध्ये जवळपास 675 किमी अंतर या मेट्रोमध्ये येणार असून 400 किमी प्रवासाचा टप्पा गेल्या 5 वर्षात सुरु झाला आहे. 21 व्या शतकात एक भारत- श्रेष्ठ भारत असे आपण म्हणतो, त्यावेळी दळणवळणासाठी एक राष्ट्र एक संपर्क यंत्रणा' तयार होणे आवश्यक आहे. मुंबईमुळे देशालासुद्धा गती मिळते. मुंबईत पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे होत आहेत. या सगळ्या योजनांमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येईल.
मुंबईत होत असलेल्या मेट्रोमुळे मुंबईकरांना सुखकर प्रवास करता येणारच आहे, त्याशिवाय या सेवेमुळे जवळपास 10 हजार इंजिनिअर्स आणि 40 हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे जवळपास 50 हजार रोजगार यामुळे मिळणार आहे. मुंबईत होत असलेल्या नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे जलद वाहतूक सेवा आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.