राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2019

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ - मुख्यमंत्री


पुणे - महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन-तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती ( जिल्हा पुणे) या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ, जळगावच्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचे ई- भूमिपूजन, मुंबई येथील जे.जे.रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, खा. संजय काकडे, खा. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आ. माधुरी मिसाळ, आ. मेधा कुलकर्णी, आ. जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

प्रास्ताविक वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी केले. ते म्हणाले, जे.जे.रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारती साठी 1200 कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला 2014 मध्ये परवानगी मिळाली होती, त्यासाठी 500 कोटी देण्यात आले. तेथे प्रवेश सुरू झाले आहेत. राज्यात आणखी 7 नवीन वैद्यकीय कॉलेज सुरू होतील. केंद्राकडे एकूण 35 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पद्धती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad