गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच रात्री मुंबईच्या विविध भागात गॅस गळती झाल्याची माहिती सोशल मीडीयावर पसरली. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभाग, महानगर गॅस, मुंबई महापालिकेकडे तक्रारी केल्या. विविध भागात गॅस गळती होऊन दुर्गंधी पसरल्याच्या बातमीने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दल, महानगर गॅस व महापालिकेचे कर्मचा-यांनी तकारीनुसार घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरु केला. गॅस नेमका कुठून गळती होतो, याचा शोध घेतला . शुक्रवारी दिवसभर संबंधित यंत्रणांनी तपासणी केली, मात्र शोध लागला नाही. महानगर गॅसने पाईप लाईन तपासणी केली, मात्र कुठेही लिकेज सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विले पार्ले, कांदिवली, दहिसर आदी भागात अग्निशमन दलाकडून गॅस गळती नेमकी कुठे झाली आहे याचा तपास आहे. दरम्यान, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याचा अंदाज नागरिकांनी वर्तवला होता. मात्र महापालिकेने यात तथ्य नसल्याचे ट्विट करत स्पष्ट केले आहे. ‘राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती, मात्र ‘आरसीएफ’मध्ये गॅस गळती झालेली नाही.’चेंबूर, कुर्ला, मानखुर्दमधून गॅसचा वास येतोय एवढीच माहिती सुरूवातीला मिळाले, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महानगर गॅस लिमिटेडने, गॅस गळतीच्या तक्रारींचे अनेक फोन रात्री यायला लागले. आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहिती मिळवत आहे. ज्या भागांतून तक्रारींचे फोन आले त्या सर्व भागात आमच्या टीम सक्रिय झाल्या असून अद्याप आमच्या कोणत्याही पाईप लाईनमध्ये गळती असल्याचे निष्पन्न झाले नाही.’ असे ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
गुरुवारी रात्री गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आपत्कालीन टीमने तात्काळ धाव घेऊन याचा शोध घेतला. मात्र कोणत्याही ठिकाणी पाईपलाईनमध्ये गळती आढळली नाही. महानगर गॅसच्या पाईपलाईन सुस्थितीत आहेत.
नीरा अस्थाना, मुख्य व्यवस्थापक, महानगर गॅस लिमिटेड