नवी मुंबई – ठाणे जिल्ह्यातील प्रभावशाली नेते व महाराष्ट्राचे माजी वनमंत्री गणेश नाईक यांना बेलापूरच्या विधानसभेच्या जागेची हमी दिल्याशिवाय राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक एक गठ्ठा भाजपात जाण्यास तयार नाहीत. बेलापूरमध्ये गणेश नाईकांना हरवून मंदा म्हात्रे या भाजपाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. आता भाजपाला गणेश नाईकांसारख्या मातब्बर नेत्यासाठी मंदा म्हात्रे यांना घरी बसवावे लागणार आहे. त्यामुळेच भाजपाला गणेश नाईकांना विधानसभेची हमी देण्यास उशीर होत आहे. जोपर्यंत गणेश नाईक यांना हमी मिळत नाही तोपर्यंत 55 नगरसेवक भाजपात जाणार नाहीत व भाजपाचा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकणार नाही.
आज राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करणार होते. मात्र गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघ सोडत नाहीत तोपर्यंत वेगळा गट स्थापन करून भाजपाचा झेंडा नवी मुंबईवर फडकू देऊ नये, असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. त्यामुळे आजचा वेगळा गट बनविण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
भाजपापेक्षा काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेत जाऊया, असाही नगरसेवकांचा आग्रह आहे. सध्या वेगळा गट स्थापन झाल्यास नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर राष्ट्रवादीचा, उपमहापौर काँग्रेसचा आणि विरोधात आताचे शिवसेना व भाजपा नगरसेवक बसणार आहेत.
तर, नवीन गट वेगळा बसून नाईकांना जोपर्यंत बेलापूर विधानसभेची उमेदवारी भाजप देणार नाही, तोपर्यंत नगरसेवक भाजपाला उघड पाठिंबा महापालिकेत देणार नाही, असे नियोजित सुरक्षित राजकीय डावपेच माजी महापौर सागर नाईक व आमदार संदीप नाईक यांनी आखली असल्याची माहिती आहे.