नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटींहून अधिक सदस्यांसाठी खूशखबर आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं पीएफवरील व्याजदर वाढीला मंजुरी दिली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पीएफवर ८.६५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याजदरास फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर हा व्याजदर वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. 'ईपीएफओच्या सहा कोटींहून अधिक सदस्यांना २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जमा रकमेवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे,' अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली. वर्तमान स्थितीत ईपीएफओ खात्यांमधील दाव्यांचा निपटारा ८.५५ टक्के व्याजदराने केला जात आहे. हे दर २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी होते. या वर्षातील व्याजदर पाच वर्षांतील सर्वात कमी होते. २०१६-१७मध्ये व्याजदर ८.६५ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५मध्ये कर्मचाऱ्यांना ८.७५ टक्के व्याज मिळाला होता. २०१२-१३मध्ये ८.५ टक्के व्याज देण्यात आला होता.