नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए-२ सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्याचे वर्णन निरंकुशता, अव्यवस्था आणि अराजकता या तीन शब्दांत करता येईल, अशी घणाघाती टीका काँग्रेसने रविवारी केली आहे. विविध क्षेत्रांत झालेल्या अधोगतीच्या आकडेवारीचा हवाला देत देशाची अर्थव्यवस्था खस्ताहाल बनल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
देशातील विविध आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा विकासदर नीच्चांकी झाला आहे; परंतु तरीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार नाहीत. अर्थव्यवस्था झपाट्याने रसातळाला जात आहे, याकडे केंद्र सरकार कानाडोळा करीत असल्याची टीका काँग्रेसने केली. भाजपा सरकार घटत्या विकासदराकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा व फसवणुकीचा मार्ग स्वीकारत आहे. यामुळे देश खात्रीने मंदीच्या खाईत लोटला जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
कोणत्याही समस्येवर तोडगा काढणे, अशी मोदी सरकारची ओळख सांगितली जाते; परंतु या कार्यात मोदी सरकार घोर अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाचे राजकारण सपशेल अपयशी ठरले आहे. विरोधी पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांना अटक केली जात आहे; परंतु याकडे जनता पाहत आहे. सरकारचे प्रत्येक अपयश जनता डोळ्याने पाहत आहे. भाजप संसदेला केवळ 'नोटीस बोर्ड' मानते. संसदेत चर्चा होत नाही, तर केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विधेयके मांडली जात आहेत. यामुळे लोकशाही पंगू होत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.
देशातील बिकट परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न -
अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून मोदी सरकारने मौन बाळगले असून देशातील बिकट परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा प्रहार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून केला आहे. कंपन्या बंद पडत आहेत. व्यवहार ठप्प झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे, १०० दिवसांत विकास न घडवल्याबद्दल मोदींचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.