मुंबई - मुंबईसह देशभरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईत तर १० दिवस गणेशमय वातावरण असते. या कालावधीत गणेश भक्त मोठ्या संख्येने मुंबईत बाप्पाच्या दर्शनाला येतात. या कालावधीत गणेश भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट परिवहन विभागाने ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान १८ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सांगितले.
प्रवाशांच्या सोयीकरिता रात्री ११.१५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक ७ मर्यादित - बॅकबे आगार ते विक्रोळी आगार, बसमार्ग क्रमांक २१ मर्यादित - डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक ( म्युझियम) ते देवनार आगार, बसमार्ग क्रमांक २२ मर्यादित - इलेक्ट्रिक हाऊस ते मरोळ - मारोशी बसस्थानक, बसमार्ग क्रमांक ४२ - पं. पलुस्कर चौक ते सेंडहर्स्ट रोड स्थानक, बसमार्ग क्रमांक ४४ - वरळीगाव ते श्रावण यशवंते चौक (काळाचौकी), बसमार्ग क्रमांक ५१ - इलेक्ट्रिक हाऊस ते वांद्रे आगार, बसमार्ग क्रमांक ६६ - खोदादाद सर्कल ते संत जगनाडे चौक, बसमार्ग क्रमांक ६९ - डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रभोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) या मार्गावर चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेनेही गणेश भक्तांसाठी चर्चगेट ते विरार, विरार-चर्चगेट दरम्यान ७ व ८, १२ व १३ सप्टेंबरला विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट -विरार, विरार-चर्चगेट स्थानकादरम्यान चालवण्यात येणाऱ्या लोकल प्रत्येक स्थानकांवर थांबणार आहेत. या विशेष लोकल चर्चगेट-विरार, विरार-चर्चगेट दरम्यान रात्री धावणार असून पहाटे पोहोचणार असल्याचे पश्चिम पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले.