मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून बोनससाठी संघर्ष करणार्या ‘बेस्ट’च्या कामगारांना यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय बोनस मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना 9,100 रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच बेस्ट समितीची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेस्ट उपक्रम मुंबई पालिकेकडून मिळालेल्या आर्थिक निधीतून सावरत आहे. नवीन बस घेतानाच तिकीट कपातीचाही निर्णय अंमलात आणला आहे. त्यापाठोपाठ बेस्टमधील सुमारे 41 हजार कामगारांना यंदाची दिवाळी गोड जावी म्हणून 9,100 रु. बोनस जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून तोटा सहन करणार्या बेस्ट प्रशासनाने आर्थिक परिस्थिती बदलताच शुक्रवारी बोनसचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 2018मध्ये बेस्ट कामगारांना 5,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्या आधीही 2017 मध्ये बेस्ट कामगारांना पालिकेकडून कर्ज घेऊन सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र त्यावर्षी कामगारांच्या पगारातून दरमहा 500 रुपये कापून घेण्यात आले होते.