अब की बार आघाडी १७५ पार; अजित पवारांचा नारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2019

अब की बार आघाडी १७५ पार; अजित पवारांचा नारा


मुंबई दि. ३० सप्टेंबर -अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केलीय आम्ही हा खेळ संपवू असा इशारा देतानाच 'अबकी बार आघाडी १७५ पार' असा नारा राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिला.

कॉंग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापुरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर अजितदादा पवार माध्यमांशी बोलत होते.

भारत भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत, ते सर्वात आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांना राष्ट्रवादीची विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत.

पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवार साहेबांचे कट्टर समर्थक मात्र पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. दौलत दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग बरोरा यांच्या आधी आमदार झाले होते.

आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही त्याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार. सुप्रिया सुळे यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर मित्रपक्षांशी चर्चा करणार कारण आधीच वरळीची जागा त्यांनी मागितली आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

आघाडीची घोषणा २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. काही मित्र पक्षांच्या जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे ते झालं की आघाडी जाहीर करू असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी ती जागा निवडून आणत आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहेत. ते जागा लढले नाही तर आम्ही लढू. लवकरच उमेदवाराची घोषणा करू असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यांना लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ उमेदवार समजतो. कोणीही असूदे राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad