रिपब्लिकन पक्षाच्या तेलंगणा राज्य शाखेचा भव्य मेळावा रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा हैद्राबाद येथील रविंद्र भारती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी दलित आदिवासींना सैन्यात आरक्षण देण्याची तसेच खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी केली. यावेळी रिपाइं चे नेते मोहनलाल पाटील रिपाइं तेलंगणा राज्य अध्यक्ष नागेश्वर राव, ब्रह्मानंद रेडी, पन्नासिंह, प्रभुदास, हमिद, परम नागेश्वर राव, सुनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करित आहेत. देशातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज आणि मागासवर्गीयांच्या हक्काचे संरक्षण करुन सर्व समाजाचा विश्वास जिंकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करीत आहे. तेलंगणा राज्याला शेड्युल कास्ट इंम्प्रुवमेंट प्लान अंतर्गत केंद्र सरकारने 34 हजार 378 कोटी रुपये निधी दिला आहे. मागील पाच वर्षात अनुसूचित विद्यार्थ्यांना 2 हजार 500 कोटी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील प्रलंबित प्रकल्प तसेच दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आपण राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत करु तसेच भरीव निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. तेलंगणा राज्यातील विविध योजनेत केंद्र सरकारच्या निधी वाटपाचा आढावा घेणारी बैठक आठवले यांनी घेतली. यावेळी तेलंगणा जनधन योजनेअंतर्गत 59 लाख 42 हजार 132 खाते उघडण्यात आले तसेच 12 लाख 56 हजार 532 लोकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला त्यासाठी मुद्रा योजनेद्वारे 1530 कोटीचे वाटप करण्यात आले.
तेलंगणा राज्यात दलितांवरील अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. अत्याचार ग्रस्त दलितांना तेलंगणा राज्य सरकारद्वारे केवळ 50 हजार रुपये सहानुभूती रक्कम देण्यात येते. त्यात वाढ करुन 1 लाख रुपये अत्याचारपिडीत दलितांना मदत देण्यात यावी. या सूचनेचे पत्र आपण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. तेलंगणामध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी सर्व समाजाला रिपाइंशी जोडण्याचे आवाहन आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.