मुंबई / दिल्ली - माजी कायदा मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी विधी व न्याय तसेच नगरविकास विभागाची जबाबदारी सांभाळली होती. प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे.
राम जेठमलानी जन्म १४ सप्टेंबर, इ.स. १९२३:शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान हे भारतीय वकील आणि माजी संसदसदस्य आहेत. कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकीली केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले.
जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री होते. त्यांची मुले महेश जेठमलानी आणि राणी जेठमलानी हे सुद्धा वकील आहेत.
महाराष्ट्रातील चळवळीतील अनेक नेत्यांच्या सुप्रिम कोर्टातील केसेस त्यांनी मोफत लढल्या होत्या. माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्यावर पँथरच्या काळातील खुनाची केसही त्यांनी लढली होती, त्यातून गाडे दोषमुक्त झाले होते.
जेठमलानी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. 2017 मध्ये त्यांनी वकील म्हणून निवृत्ती स्वीकारली. देशातले सगळ्यात महागडे वकील म्हणूनही त्यांची ओळख आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात जेठमलानी हे कायदे मंत्री होते. भाजपात असताना त्यांनी पक्षाविरोधात अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते.
जेठमलानी यांनी आतापर्यंत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, शेअर बाजार घोटाळ्यातला आरोपी हर्षद मेहता आणि केतन पारेख, जेसिका लाल हत्याकांडातला मनु शर्मा, राजीव गांधी आणि इंदिरा गांधींचे मारेकरी, तसंच बेकायदेशीर खाण प्रकरणातले आरोपी आणि सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा, आसाराम बापू, जयललिता, अरविंद केजरीवाल अशी हायप्रोफाईल प्रकरणं आणि व्यक्तींचे खटले जेठमलानी यांनी लढवले आहेत. राम जेठमलानी यांनी 1959 मध्ये नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा खटला लढला तेव्हा ते देशाला माहित झाले. यानंतर त्यांचा आलेख वाढतच गेला.
2011 मध्ये त्यांनी मद्रास हायकोर्टात राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची बाजू मांडली.
देशभरात गाजलेल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यात जेठमलानी केतन पारेख आणि हर्षद मेहता यांचे ते वकील होते. दहशतवादी अफजल गुरुच्या फाशीलाही जेठमलानी यांनी विरोध केला होता.
दिल्लीतील जेसिका लाल हत्या प्रकरणात त्यांनी मनू शर्मा या आरोपीची बाजू मांडली होती.
सोहराबुद्दीन एनकाऊन्टरमध्ये त्यांनी अमित शाह यांचा खटला लढला होता.