मुंबई - शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा करताना जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महायुतीतील कोणता पक्ष किती जागा व कोणत्या जागा लढवणार याचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. यावरून युतीत जागा वाटपावरून वाद असल्याचं अधोरेखित होत आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवून मित्र पक्षांना झुलवण्याचाही यामागे उद्देश असू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.