विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2019

विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ


मुंबई - संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 600 रुपयांवरून 1000 रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना 1100 रुपये तर दोन अपत्य असणाऱ्या विधवांना 1200 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी 1648 कोटींच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत समावेश होतो. केंद्राकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 65 ते 79 वर्ष वयोगटासाठी 200 रुपये आणि 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी 500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अनुक्रमे 400 रुपये आणि 100 रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. आजच्या निर्णयानुसार राज्याच्या अनुदानात प्रत्येकी 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेतून लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेत समावेश होतो. केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 300 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांपैकी अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अर्थसहाय्यात 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याच योजनेंतर्गत एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अर्थसहाय्यात 500 रुपयांची वाढ आणि दोन अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अर्थसहाय्यात 600 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेतून निराधार विधवा लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये, एक अपत्य असणाऱ्या विधवांना 1100 रुपये आणि दोन अपत्य असणाऱ्या विधवांना 1200 रुपये अनुदान मिळणार आहे.

Post Bottom Ad