मुंबई, दि. २८ ऑगस्ट, २०१९ :- रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवर असणाऱ्या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता १५५ कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडाचे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांनी आज दिली.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, म्हाडाला शासनाने सदर खर्च परत करण्याच्या अटीवर ही मान्यता देण्यात आली आहे. सदरहू प्रकल्पाचे संकल्प चित्र, आराखडे, नकाशे, अंदाजपत्रक तयार करणे, आवश्यक परवानग्या प्राप्त करणे, कामावर देखरेख ठेवणे यासाठी प्रकल्प समंत्रकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गिरणी कामगारांना म्हाडामार्फत विक्री करण्यात आलेल्या सदनिका ५ वर्षानंतर विक्री करता येऊ शकतील, असा निर्णयही घेण्यात आला. पूर्वी या सदनिका १० वर्षापर्यंत विक्री करता येत नव्हत्या, असे सामंत यांनी सांगितले. विरार बोळींज येथे म्हाड विनियम १३ (२) अंतर्गत कलाकार (३०० सदनिका), म्हाडा कर्मचारी (२०० सदनिका), पत्रकार (२०० सदनिका), शासकीय कर्मचारी (२०० सदनिका) अशा एकूण ९०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मुंबईतील तुंगा पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५०० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथील कोंकण नगर या म्हाडा वसाहतीमध्ये बाह्य सुविधांचे उन्नतीकरण व नवीन सोईसुविधा पुरविणे या कामांना प्राधिकरणाने मान्यता दिली. याअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे व सेप्टिक टॅंक बांधणे, रस्त्यांचे उन्नतीकरण करणे, बहुउद्देशीय सभागृह बांधणे, व्यायामशाळा बांधणे या कामांचा समावेश असून त्याकरिता ११.७० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. मौजे रावतळे (चिपळूण) येथील म्हाडाच्या ५. ११ हेक्टर जमिनीपैकी ४० टक्के जमीन मूळ जमिन मालकांच्या समन्वय समितीस भाडेपट्ट्याने देणे व उर्वरित ६० टक्के जमिनीवर म्हाडामार्फत योजना राबविण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. सदर ६० टक्के जमिन तीन भागामध्ये विभागण्यात येणार असून या जमिनीवर अत्यल्प उत्पन्न गटासाठी पहिल्या टप्प्यात ४१८ सदनिका व १७ दुकाने तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अल्प उत्पन्न गटासाठी २३२ सदनिका व ६० दुकाने बांधण्यात येणार आहेत. तसेच पोस्ट ऑफिस, दवाखाना व नाट्यगृहही उभारण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले.
कोंकण मंडळाने जोगळे दापोली येथे संपादित केलेल्या ०.८१ हेक्टर जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी तळ +४ मजल्यांच्या इमारतीमध्ये १६० सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ८० सदनिका व सभागृह बांधणे या कामासाठी ३७.४० कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे खाजगी जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १५० सदनिका उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हाडातर्फे १० कोटी रुपये -
सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पुरामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे या पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हाडातर्फे १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.