मुंबई: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या पुरग्रस्तपरिस्थितीतील बाधितांच्या वैयक्तीक मदतीसाठी तात्काळ रुपये १०० कोटी मंजुर करण्यात यावेत, असे विनंती करणारे पत्र रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांना अन्य सुविधा देण्यासाठी अधिकच्या निधीची तरतुद करण्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापुर तसेच अन्य तालुक्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या तालुक्यांच्या शहरातील रहिवासी भागातील घरे तसेच मुख्य बाजारपेठा पाण्याखाली आल्याने नागरीकांचे तसेच व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात दरडी कोसळल्या आहेत. डोंगर खचून विविध रस्ते मार्ग खंडीत झाले आहेत. अनेक तालुक्यांतील जमिनीला भेगा पडल्याने त्या लगतची अनेक घरे खचली आहेत. रस्ते, साकव, पाखाडी, विहीरी, शेतीची देखील नासधूस झाली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी वित्तिय हानी तसेच जिवीत हानी झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या वित्तीय व जीवीत हानीचा सविस्तर अहवाला मला सादर केला आहे. ही हानी भरुन काढण्यासाठी एकुण रुपये १००४९.२३ लक्ष इतक्या रकमेची गरज असल्याचे कळविले आहे.
या जिल्ह्यातील पुरग्रस्त रहिवाशांना दिलासा देण्याबरोबरच मदत करण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात यावी. त्याचबरोबर केंद्र शासनाची आर्थिक मदत मिळणेकरीता केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा, अशी विनंतीही रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी लेखी पत्राद्वारे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. त्याचप्रमाणे खचलेली घरे, रस्ते, साकव, विहीरी, शेती, संरक्षण भिंत यासाठीही अधिकच्या निधीची व्यवस्था करावी, अशी विनंतही त्यांनी केली आहे.