मुंबई – अन्याय सहन न करण्याचा स्वभाव असल्याने नारायण राणेंची घालमेल झाली. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर कॉंग्रेस की राष्ट्रवादीमध्ये जावे? अशी त्यांची द्विधा मन:स्थिती झाली होती. त्यामुळे त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या, त्यातील एक चिठ्ठी उचलली. ही चिठ्ठी कॉंग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक हे मी बोलणार नाही, असा मार्मिक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. राणे यांच्या ‘नो होल्डस् बार्ड’ आणि ‘झंझावात’ या इंग्रजी आणि मराठी आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी पवारांनी राणेंच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केले. नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय का घेतला? ही आतली गोष्ट मला माहीत नाही आणि माहीत असली तरी सांगणार नाही, असे पवारांनी सांगताच सभागृहात एकच खसखस पिकली. यावेळी पवारांनी राणेंचा कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय कसा चुकीचा होता, हे अप्रत्यक्षपणे सांगितले. राणेंनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यावर एकदा आमची भेट झाली. तेव्हा कॉंग्रेसमध्ये पाच-सहा महिन्यात काहीच मिळत नाही. त्यामुळे फार अपेक्षा ठेवू नका. आमचे कॉंग्रेसमध्ये आयुष्य गेलंय, असे राणेंना आपण सांगितले होते, असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. पवारांनी सत्तेपेक्षा विरोधात काम करण्याचा आनंद सर्वाधिक असल्याचे यावेळी स्पष्ट केले. विरोधात असताना कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे शेवटच्या माणसाला भेटता येते, असे सांगतानाच, पण कायम विरोधातच राहू या भ्रमात कोणी राहू नये. दिवस बदलत असतात, असा टोलाही त्यांनी हाणला.
…तर आज राज्याचे चित्र वेगळे असते – गडकरी
नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असे मी राणेंना समजावले होते. राणेंकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य होते. त्यावेळी नारायण राणेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी गडकरी यांनी नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेही आपले नेते असल्याचे सांगितले.
राणे आणि मी दोघेही ‘स्टेट फॉरवर्ड’ आहोत. दोघांच्याही मनात कोणताही छलकपट नसतो. राजकारणात पद नसेल तर मैत्री कमी होते. पण राणे आणि माझी मैत्री कायम राहिली, असे गडकरी म्हणाले. 2001 ते 2009 या काळातील राणेंच्या आयुष्यातील घडामोडी मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकात राणेंचे 75 टक्के आयुष्यही आलेले नाही, असे गडकरी यांनी सांगितले.