मुंबई - आरे कॉलनीतील नाल्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवण्यासाठी मुंबई पोलीस विभागातील कॉन्स्टेबलनं जीवाची पर्वा न करता त्यात उडी घेतली आणि वृद्धाला सुरक्षित बाहेर काढलं. विशाल पाटील असं कॉन्स्टेबलचं नाव आहे.
आरे कॉलनीतील नाल्यात वृद्ध पडल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी मिळाली. त्यानंतर लगेच घटनास्थळी मोबाइल व्हॅन पाठवण्यात आली. आरे कॉलनी पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबल विशाल पाटीलही व्हॅनमध्ये होते. काही मिनिटांतच व्हॅन तेथे पोहोचली. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वृद्ध व्यक्ती वाहून जात असल्याचं पाटील यांनी पाहिलं. त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट नाल्यात उडी घेतली. पाटील यांनी वृद्धाला खांद्यावर घेत सुरक्षित बाहेर काढलं. हंसराज असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक पाचमध्ये ते एकटेच राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते नाल्यात कसे पडले हे अद्याप कळू शकलं नाही.