मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही - अर्जुन खोतकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2019

मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही - अर्जुन खोतकर



मुंबई, दि. ११ : राज्यातील इतर भागातून दूध उपलब्ध करून दिले जात असल्याने आता मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही पशूसंवर्धन,दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मुंबई शहर परिसरातील दूध तुटवड्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

मुंबई शहर परिसरात दररोज सुमारे ३५ लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होते. यात मुंबई शहर आणि परिसरात लागणाऱ्या दुधाचा पुरवठा राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातून होतो. मुंबई शहर परिसरात प्रामुख्याने अमुल, गोकुळ, वारणा, प्रभात, राजहंस, मदर डेअरी, गोवर्धन, विकास इ. प्रमुख ब्रॅन्डचे दूध विक्रीसाठी येते.

१० ऑगस्ट रोजी प्रमुख सहकारी व खाजगी प्रकल्पांकडून मुंबईत पुरवठा झालेल्या सुमारे ३१.५४ लाख लिटर दुधाच्या तुलनेत दि. ११.८.२०१९ रोजी ३१.०३ लाख लिटर दूध वितरण झाले आहे. म्हणजेच दि. १०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत शहरातील वितरणात ०.५१ लाख लिटरने कमी झाले. दि.१०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा सहकारी दूध संघाचा मुंबईतील दूध पुरवठा नियमीत झाला असून फक्त गोकुळ सहकारी दूध संघामार्फत मुंबईत येणारे दूध सरासरी ६.७५ लाख लिटरऐवजी १.४८ लाख लिटर मुंबई वितरणासाठी उपलब्ध झाले.

गोकुळकडून मुंबईत वितरणासाठी कमी पडलेल्या ६.७५ लाख लिटर दुधाची अमुलने त्यांचे वितरण २.९५ लाख लिटर, मदर डेअरी ०.१८ लाख लिटर, प्रभात डेअरी ०.०३ लाख लिटर, गोवर्धन ०.४८ लाख लिटर, गोविंद ०.०५ लाख लिटर,सोनाई डेअरी (इंदापूर) ०.३४ लाख लिटर, नंदिनी ०.२४ लाख लिटरने असे एकूण ४.२७ लाख लिटर ने दुधाची भरपाई केली आहे.

अशाप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातून कमी पुरवठा झालेल्या 6.75 लाख लिटर दुधापैकी वरील सर्व ब्रॅन्डनी त्यांची वितरणाचा पुरवठा वाढवून सुमारे ४.२७ लाख लिटरचे जास्तीचे वितरण केले आहे. तसेच नाशिक विभागातून सुध्दा सहकारी व खाजगी प्रकल्पांकडून जळगाव संघ ०.६१ लाख लिटर पतंजली आयुर्वेद ०.२८ लाख लिटर, मळगंगा डेअरी ०.२४ लाख लिटर, राजहंस ०.१०, संगमनेर ०.१० व गोदावरी खोरे ०.१० लाख लिटर असे एकूण सुमारे १.४३ लाख लिटर दुधाचा नियमीत पुरवठा मुंबईत झाला आहे. सर्व प्रमुख ब्रॅन्डकडे पुढील २ दिवसासाठी वितरणासाठी आवश्यक असलेला दुधाचा साठा उपलब्ध आहे.

पूरग्रस्त जिल्हे सोडून नाशिक विभागातील सहकारी व खाजगी प्रकल्पांना त्यांच्या मार्फत मुंबईस होणाऱ्या दुध पुरवठयात पूर परिस्थिती सुधारणा होईपर्यत वाढ करण्याबाबत विभागामार्फत सूचना देण्यात आल्याची माहिती दुग्ध विकास आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी दिली आहे.

Post Bottom Ad