मुंबई - तुर्भे महापालिका मराठी शाळेच्या दुरुस्ती कारणास्तव येथील विद्यार्थ्यांना चित्ता कॅम्प येथील शहाजीनगर महापालिका शाळा संकुल क्र.१ याठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सेवासुविधांचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांच्यासमवेत (दि.३१ जुलै २०१९) पाहणी करुन आढावा घेतला. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, उप शिक्षणाधिकारी जयश्री यादव, शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.
तुर्भे मनपा मराठी शाळा संकुलातील मराठी, हिंदी, उर्दू, तामिळ, कन्नड तसेच एमपीएस या सहा माध्यमांतील १७०० विद्यार्थ्यांना चित्ता कॅम्प येथील शहाजीनगर महापालिका शाळा संकुल क्र.१ याठिकाणी २२ जुलै २०१९ पासून तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. १४०० विद्यार्थी मुख्य शाळा संकुलात तर ३०० विद्यार्थी हे शाळासंकुलातील तात्पुरत्या स्वरुपातील ट्रॉन्झिट कॅम्पमध्ये बसविण्यात आले आहे. ट्रॉन्झिट कॅम्पमधील आठ वर्गखोल्यांमध्ये छतावरुन पाणी गळणे तसेच भिंतीला करंट येत असल्याची तक्रार महापौरांना प्राप्त होताच महापौरांनी सोमवार ०५ ऑगस्ट २०१९ ला तातडीने शाळेला भेट देऊन आठही वर्गखोल्यांची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबतच चर्चा केली. ट्रॉन्झिट कॅम्पमधील आठही वर्गखोल्यांमध्ये नविन शेड बसविणे तसेच नविन वायरींग टाकून नविन टयुबलाईट, पंखे बसविण्याची सूचना महापौरांनी शाळा पायाभूत सुविधा कक्षाच्या अधिकाऱयांना दिल्या.येत्या सोमवारपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करावे जेणेकरुन विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशी सूचना महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना केली. त्यासोबतच काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या शाळेला भेट देणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.